अजित पवार यांच्याप्रमाणे आमदार कानडेदेखील शब्दाला पक्के- सयाजी शिंदे
प्रतिनिधी -इमरान शेख
श्रीरामपूर – उपमुख्यमंत्री अजित पवार हे शब्दाचे पक्के आहेत. दिलेला शब्द ते पाळतात. त्याचप्रमाणे आमदार लहू कानडे हे देखील आपल्या शब्दाला पक्के आहेत. आ. कानडे हे कवी आहेत. साहित्यिक आहेत.. प्रशासकीय कामाचा त्यांना अनुभव आहे. तसेच तालुक्यातील प्रश्नांचा अभ्यास आहे. त्यामुळे येत्या 20 तारखेला आपण त्यांना निवडून देऊन त्यांच्या विजयाचा गुलाल उधळावा, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे स्टार प्रचारक सयाजी शिंदे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार लहू कानडे यांच्या प्रचारार्थ बेलापूर येथे झालेल्या जाहीर सभेत श्री. शिंदे बोलत होते. ज्येष्ठ नागरिक कनजीशेठ टाक अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक, आ. कानडे, प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक, जिल्हाध्यक्ष कपिल पवार, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, श्रीरामपूर तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष इंद्रभान पाटील थोरात, भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मिस्टर शेलार, माजी सदस्य शरद नवले, बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे, सरपंच स्वाती अमोलिक यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते,
श्री. शिंदे म्हणाले, राज्यातील उत्कृष्ट राजकारणी कोण असेल तर ते अजित पवार आहेत. जे करतात ते बोलतात. आम्हीही बोलल्याप्रमाणे आ. कानडे यांना निवडून देणार आहोत. देवळालीसह या ठिकाणी मला तरुणांचा उत्साह दिसला. तरुणांनी पार्टीत रहावे, परंतु रात्रीच्या मित्रांच्या पार्टीत राहू नये, जन्मदाती आई, धरणी माता आणि वृक्ष यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. आपल्या आईचा नेहमी आदर करावा, असे सांगून पुढील पाच वर्षात आपल्याला वृक्ष संवर्धनाचे काम करावयाचे आहे. त्यासाठी शाळा शाळातील मुलांचे ग्रुप तयार करावे, आपण त्यांना बिया देऊ, त्यातून वृक्षांचे संरक्षण करू, असे ते म्हणाले.
आ. कानडे म्हणाले, माझ्या कुटुंबाला राजकीय वारसा नाही. पाच वर्षांपूर्वी मायबाप मतदारांनी विश्वास टाकून आमदार केले. आपण भेदभाव, गट तट, पक्ष न बघता येईल ते काम प्रामाणिकपणे केले, तेव्हाचे काँग्रेसचे आमदार टाटा करून निघून गेले. त्यावेळी काँग्रेसने उमेदवारी दिली. जनतेच्या आशीर्वादाने आपण आमदार झालो. पाच वर्षात बाराशे कोटी रुपयांची विकास कामे केली. महाविकास आघाडीत असताना तसेच महायुतीच्या सरकारात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी देऊन सहकार्य केले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही भरभरून निधी दिला. त्यामुळे दळणवळण, वीज, शेती, युवक, महिला यांचे प्रश्न सोडवू शकलो. शेवटच्या दिवशी काँग्रेसने उमेदवारी नाकारली. चांडाळ चौकडीने कटकारस्थान करून प्रामाणिक माणसावर अन्याय केला.. हलक्या काळजाच्या नेत्यांनी त्यांचे ऐकले. त्यांना धडा शिकवण्यासाठी या निवडणुकीत आपल्याला पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
श्री. आदिक म्हणाले, आ. कानडे हे पारदर्शक काम करणारे आमदार आहेत. मतदारसंघात त्यांनी कोट्यावधी रुपयांची कामे केली. परंतु त्या कामातील वाटा मिळाला नाही, त्यांचे लाड पुरविले नाहीत, म्हणून जवळ असणार्यांनी कटकारस्थान करून त्यांचे तिकीट कापले. परंतु त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसला एक कर्तबगार आमदार लाभला असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लहू कानडे हेच महायुतीचे उमेदवार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांना मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अरुण पाटील नाईक, शरद नवले, अभिषेक खंडागळे, भाजपाचे प्रफुल्ल डावरे, आकाश क्षीरसागर, इस्माईल शेख, अशोक कारखान्याचे माजी संचालक जालिंदर कुऱ्हे यांची भाषणे झाली. यावेळी वळदगावचे सरपंच अशोक भोसले, राधाकृष्ण तांबे, कोंडीराम विटनोर, अनिल बिडे, विधानसभा अध्यक्ष किशोर बकाल, सुनील थोरात, ॲड. जयंत चौधरी, माजी सरपंच रामराव शेटे, प्रा. मच्छिंद्र पारखे, भाऊसाहेब कुताळ, जाफर आतार, दादासाहेब मेहत्रे, दीपक पवार, अक्षय नाईक, मोहसीन शेख, जमीर पिंजारी, चंद्रकांत नवले, बाळासाहेब दानी, किशोर कांबळे, मुस्ताक शेख, दीपक निंबाळकर, प्रशांत खंडागळे, चंद्रकांत नाईक, सचिन ब्राह्मणे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
……..