प्रमाणपत्रासाठी बांधकाम कामगारांची अडवणूक करू नका
अन्यथा ग्रामसेवकांच्या विरोधात तीव्र आंदोलन- प्रकाश चित्ते

श्रीरामपूर प्रतिनिधी –केशव आसने

श्रीरामपूर -महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने 23 सप्टेंबर 2021 रोजी काढलेल्या परिपत्रकामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा वर्ग कोणता असावा या संदर्भात आदेश दिलेले आहेत . बांधकाम कामगारांचे प्रमाणपत्र देणाऱ्या ग्रामसेवकांच्या अधिकाराचा वरील परिपत्रकाशी कोणताही संबंध नाही . मात्र ग्रामसेवकांनी वरील परिपत्रकाचा चुकीचा अर्थ घेऊन बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देणे थांबवले आहे . त्यामुळे बांधकाम कामगारांच्या दरवर्षीच्या नोंदणीचे नूतनीकरण थांबले आहे हे अत्यंत चुकीचे असून ग्रामसेवकांच्या या भूमिकेत बदल न झाल्यास त्यास आक्रमक आंदोलनाने उत्तर दिले जाईल असा इशारा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेशाचे उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी दिला आहे .

 महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास खात्याने दिनांक 16 नोव्हेंबर 2015 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीसाठी लागणाऱ्या प्रमाणपत्राचे अधिकार संपूर्णपणे ग्रामसेवकांना प्रदान करण्यात आलेले आहेत ते काढून घेतल्याचे कुठलेही नव्याने परिपत्रक ग्राम विकास खात्याने अद्याप पर्यंत काढलेले नाही . त्यामुळे ग्रामसेवकांनी चुकीच्या परिपत्रकाचा संदर्भ देऊन चुकीची भूमिका घेऊ नये . कारण दरवर्षी बांधकाम कामगारांना त्यांच्या नोंदणीचे वार्षिक मुदत संपण्याच्या तारखेच्या आतच नूतनीकरण करावे लागते . त्यामुळे विशिष्ट कालावधीतच ही नोंदणी होणे गरजेचे आहे . मात्र श्रीरामपूर तालुक्यात ग्रामसेवकांनी ही प्रमाणपत्रे देणे थांबविल्याने त्या कामगारांची नोंदणी रद्द होण्याचा धोका आहे शेजारील नेवासा व राहता तालुक्यामधील ग्रामसेवक ही प्रमाणपत्रे देतात त्यामुळे श्रीरामपूर तालुका हा काही नगर जिल्ह्याच्या बाहेर नाही .तरी श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामसेवकांनी आडमुठी भूमिका घेऊ नये .असे या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे .

या बांधकाम कामगारांच्या प्रमाणपत्र देण्याचे अधिकार पूर्णपणे ग्रामसेवकांनाच असल्याचे हे ग्रामसेवकांना माहीत असूनही श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामसेवक ही प्रमाणपत्र देण्यास तयार नाही हा बांधकाम कामगारांवर अन्याय असून केवळ श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामसेवकांच्या या अन्यायकारक भूमिकेमुळे श्रीरामपूर तालुक्यातील हजारो बांधकाम कामगार बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांपासून वंचित राहण्याचा धोका आहे यापुढील काळात श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामसेवकांनी प्रमाणपत्र न देण्याची भूमिका कायम ठेवल्यास त्यांना मोठ्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा बांधकाम कामगार संघटनेचे सुनील थोरात , भाऊसाहेब हुरुळे ,गोरक्षनाथ आसणे ,सुनील वाबळे , गोरख गुडेकर ,साईनाथ मुठे , गोरख साळवे आदींसह अनेक कामगारांनी या पत्रकात दिला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!