‘ ठेकेदारांनो सावधान, ‘गाव जागा होतोय, ची भोकरकरांना प्रचीती
घनकचरा निर्मुलन कचरा डेपोच्या टाक्यांचे काम निकृष्ट मटेरियलमुळे विरोधक व सत्ताधार्यांनी बंद पाडले.
( प्रतिनिधी -चंद्रकांत झुरंगे,भोकर)
– श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे घनकचरा निर्मुलन यंत्रणा उभारणीचे कामात कचरा साठविण्यासाठीच्या टाक्या बांधकामास निकृष्ट मटेरियल चा वापर दक्ष ग्रामस्थ व सत्ताधार्यांनीही थांबवत काम बंद पाडले. येथील दक्ष कार्यकर्ते, सोसायटीचे माजी चेअरमन गणेश छल्लारेंसह काही सदस्यांनी भेट देवून पाहणी केली असता येथे वाळू ऐवजी डस्ट अन् कच्च्या विटात बांधकाम सुरू होतयं हे लक्षात येताच बांधकाम थांबवत निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरू नका, दुसरे चांगले मटेरियल घेवून या मग काम करा असे सांगीतले, लागलीच सत्ताधारी गट ही दाखल झाला आमच्या काळात असा प्रकार चालणार नाही, कच्च्या विटा उचलुन घ्या, डस्ट नको वाळू आणा मगच काम सुरू करा ते ही उत्कृष्ट प्रतीचे मटेरियल वापरून टिकाऊ काम करा अशा सुचना संबधीत ठेकेदाराला दिल्याने हि चर्चा गावभर पसरली ‘अन् टेकेदारांनो सावधान आता गाव जागा होतोय’ अशा प्रतिक्रीया अनेकाच्या उमटल्या.
गेल्या चार दिवसांपुर्वी आमदार लहु कानडेंच्या हस्ते भोकर येथे घनकचरा निर्मुलन यंत्रणा उभारणीचे भुमीपुजन झाले अन् प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाली परंतू येथे कच्ची विट व वाळू ऐवजी डस्ट वापरात येणार असल्याचे तत्कालीन सत्ताधारी व आजचे राजकीय विरोधक असलेल्या माजी आमदार मुरकूटे गटाचे सोसायटीचे माजी अध्यक्ष गणेश छल्लारे, ग्रामपंचायत सदस्य गीरीष मते, काळू गायकवाड व ऋषी झिने त्या ठिकाणी दाखल झाले. येथे कच्ची विट व डस्टमध्ये बांधकाम सुरू होणार हे लक्षात येताच त्यांनी लागलीच निकृष्ट मटेरियलचा वापर करू नका, दुसरे मटेरियल आणा त्या शिवाय काम सुरू होवू देणार नाही असा पवित्रा घेतला.
हा प्रकार नव्याने सत्तेत आलेले आमदार लहु कानडे गटाचे प्रमुख कार्यकर्ते काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष सुदाम पटारे, मार्गदर्शक मच्छींद्र पटारे व सरपंच पती प्रताप पटारे हे ही काम बंद पाडल्याने तावातावाने बांधकाम स्थळी दाखल झाले. राजकीय विरोधक त्यातच पहीलेच काम बंद पाडण्याच्या प्रयत्नाने काही वेळ चांगलीच शाब्दीक चकमक सुरू झाली. आम्ही कधी तुमच्या कामावर आलो का? तुम्ही काय दिवे लावलेत गावाला माहीती आहे, म्हणूनच आम्हाला संधी मिळाली आदि शब्द प्रयोग सुरू झाले, राजकीय वाद पेटणार तेव्हढ्यात प्रत्यक्ष मटेरियलची पाहणी केली असता येथे कच्ची व निकृष्ट विट असल्याचे सत्ताधार्यांचे ही लक्षात आले अन् लागलीच सत्ताधार्यांनी ही संबधीत ठेकेदारास ‘आम्हाला असा प्रकार चालणार नाही, लागलीच या विटा उचलुन घ्या चांगल्या प्रतिच्या व चांगल्या भाजलेल्या विटा आणा शिवाय डस्टचा वापर करायचा नाही, वाळू आणा अन् चांगल्या प्रतिचे उत्कृष्ट व टिकाऊ काम करा’ असे सुनावण्यात आले.
आमच्या काळात चांगलेच मटेरियल वापरले जाईल, काम उत्कृष्ट व टिकाऊच होईल, आम्ही नवीन सत्तेत आहोत, तुम्ही अनुभवी आहात असेच वेळेच्या वेळी लक्ष ठेवून सहकार्य करत जा, असे राजकीय विरोधकांना ही सांगत, यामुळे आम्हाला ही शिकायला मिळणार असल्याचा खुलासा मच्छींद्र पटारे, प्रताप पटारे व सुदाम पटारे यांनी या ठिकाणी केला. त्याच बरोबर यापुढे कुठलेही मटेरियल आणल्यानंतर प्रथम आम्हाला दाखविल्याशिवाय वापरायचे नाही अशा सक्त सुचना ही यावेळी सत्ताधार्यांनी ठेकेदारास दिल्या.
यावेळी काही काळ दोन ही गटात हातवारे करत चांगलीच शाब्दीक चकमक झाली, त्यात अनेक मागच्या उकाळ्या पाकाळ्या निघाल्याने उपस्थीतांची काही काळ चांगली करमणूक ही झाली. मात्र हे होत असताना कुणाचे काही असो पण प्रबळ व जागरूक विरोधकांमुळे व चांगले काम व कारभार करण्याची मनिषा घेवून नव्याने सत्तेत आलेले सत्ताधारी यांच्यामुळे पुढची कामे ही उत्कृष्ट होणार यात शंकाच राहीली नसल्याने गाव पातळीवर मात्र ‘ठेकेदारांनो सावधान, आता गाव जागा होतोय’ अशा प्रतिक्रीया उमटत होत्या.
यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन गणेश छल्लारे, माजी उपसरपंच महेश पटारे, गंगाराम गायकवाड, गीरीष मते, काळू गायकवाड, ऋषी झिने, अविनाश मते, मच्छींद्र पटारे, सुदाम पटारे, प्रताप पटारे, संदिप गांधले, आप्पासाहेब जाधव, विजय अमोलीक, मारूती शिंदे, वैभव पटारे, माणीक पटारे, संजय डूकरे, काळू डूकरे, दगडू अभंग, आप्पा मोरे व बबन काळे आदिंसह मान्यवर व कार्यकर्ते उपस्थीत होते.