भोकरला रोहित्र, पानबुडीनंतर चोरट्यांचा मोर्चा घरफोड्याकडे
दोन ठिकाणी प्रयत्न फसला तर तिसर्‍या ठिकाणी ही हाती काहीच लागले नाही, ग्रामसुरक्षेच्या कॉलने गाव जागे झाले

भोकर( प्रतिनिधी–चंद्रकांत झुरंगे )

 

– श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे महावितरणचे रोहीत्र, शेतकर्‍यांच्या पानबुडी नंतर चोरट्यांनी आपला मोर्चा आता घराकडे वळविल्याचे दिसत आहे. येथील प्रेस फोटोग्राफर भानुदास बेरड यांच्या घरात मध्यरात्री प्रवेश करत त्यांच्या सौभाग्यवतीचे गळ्यातील मंगळसुत्र चोरट्यांनी ओरबडले, त्याच बरोबर येथून जवळच असलेले अशोक खेडकर व राजेंद्र मते यांचे घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतू तेथील प्रयत्न अयशस्वी ठरला असला तरी भोकर परीसरातील चोर्‍यांचे सत्र थांबत नसल्याने नागरीक भयभित झाल्याचे दिसत आहे. सुदैवाने बेरड यांच्या पँटच्या खिशातील 40 हजाराची रोकड मात्र बचावली.
भोकर शिवारात गेल्या महिण्यांपासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. सुरूवातीला या चोरट्यांनी महावितरणचे रोहीत्र चोरले, त्यानंतर संजय कोते यांच्या दोन, रमेश तांबे याची एक व पुंडलीक पटारे यांची एक अशा प्रकारे चार पानबुडी चोरट्यांनी केबलसह चोरून नेल्या या चोर्‍यांचा अद्याप पर्यंत कुठलाच तपास लागलेला नसताना मध्यंतरीच्या काळात दत्तात्रय पटारे यांच्या क्षेत्रातील व सतीष चौधरी यांच्या शेतातील महावितरणचे रोहीत्र चोरण्याचा प्रयत्न फसल्यानंतर चोरट्यांनी त्यांचा मोर्चा घराकडे वळविल्याचे दिसत आहे.
या चोरट्यांनी काल सोमवार दि. 22 एप्रीलच्या मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास भोकर शिवारातील गट नं.205 मध्ये वस्ती असलेल्या अशोक खेडकर याच्या वस्तीवर या चोरट्यांनी घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला परंतू तेथे त्यांच्या 82 वर्षाच्या वृद्ध मातोश्री भिमबाई खंडेराव खेडकर ह्या वृद्धपकाळाने गुडघ्याच्या वेदना अनावर झाल्याने त्यास मलम लावत असतानाच डोक्याला केसरी उपरणे बांधलेला अंगात गुलाबी शर्ट असलेला एक अनोळखी व्यक्ती घरात डोकवत असल्याचे लक्षात येताच त्यांनी लागलीच अशोक खेडकर यांना उठवल्यिाने त्या चोरट्यांनी तेथून पळ काढला.
त्यानंतर दोन वाजेच्या सुमारास वडजाई शिवारात गट नं.151 मध्ये वस्ती असलेले प्रेस फोटोग्राफर भानुदास बेरड हे उकाडा सहन होत नसल्याने दरवाजा उघडा ठेवून झोपलेले असताना या चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करत त्यांच्या मातोश्री शेवंताबाई यांची थैली एकाने बाहेरील दुसर्‍याजवळ दिली. अन् त्यांच्या पत्नी सौ. माया बेरड यांच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरट्यांनी तोडण्याचा प्रयत्न करत असतानाच गळ्याला रूतल्याने त्यांना जाग आली तर त्यांचे समोर तोच वरील वर्णनाचा चोरटा गळ्यातील मंगळसुत्र ओरबडत असल्याचे लक्षात येताच त्या जोराने किंचाळल्याने जवळ झोपलेले पती भानुदास व चिरंजीव आदित्य हे जागे झाले अन् चोरट्यांनी धुम ठोकली तसा बेरड यांनी त्या दोघांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतू तो अयशस्वी ठरला तो पर्यंत सौ. माया यांचा किंचाळल्याचा आवाज ऐकून बाकीचे भाऊ जागे झाले त्यांनी हि त्या चोरट्यांचा पाठलाग केला परंतू तो पर्यंत उशीर झालेला होता. या दरम्यान सौ. माया यांच्या मंगळसुत्र ओरबडता त्या किरकोळ जखमी झाल्या या दरम्यान त्या चोरट्यांना काही सोन्याच्या मन्यावर समाधान मानून पळ काढावा लागला.
हा प्रकार समजताच काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष सुदामराव पटारे यांनी लागलीच ग्रामसुरक्षा यंत्रेणेचा वापर करत गाव जागे केले. त्यानंतर या चोरट्यांनी तेथून काही अंतरावर असलेल्या राजेंद्र मते यांच्या वस्तीवर चोरीसाठी गेले असतानाच राजेंद्र यांचा मुलगा नुकताच ट्रॅक्टरने नांगरट करून घरी आलेला असल्याने त्याला या चोरट्यांची चाहुल लागल्याने तेथे ही त्यांची डाळ न शिजल्याने तेथून ही त्यांना पळ काढावा लागला.
या घटनेने व ग्रामसुरक्षेच्या कॉलने गाव जागे झाले त्या बरोबर अनेकांनी रात्र जागवून काढली मात्र हा कॉल होवून ही पोलीसांचे गस्ती पथक किंवा पोलीस इकडे न फिरकल्याने नागरीकांत नाराजी पसरताना दिसली कारण एकीकडे ग्रामसुरक्षेच्या कॉलने गाव जागवले मात्र याच दरम्यान अनेकांनी तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतू तेथील फोन उचलला गेला नाही त्याबाबत चौकशी केली असता तालुका पोलीस ठाण्याचा फोन कायमच नादुरूस्त असतो अन् ड्युटीवर कोण आहे त्यांचा मोबाईल नंबर सर्वांकडे असणे शक्य नसल्याने अशा वेळी पोलीसांची मदत कशी घ्यायची असा प्रश्न नागरीकांपुढे पडलेला दिसत आहे. या बाबत वरीष्ठांनी लक्ष घालण्याची मागणी नागरीकांकडून होत आहे. या प्रकरणी उशीरापर्यंत पोलीसांत गुन्हा दाखल नव्हता.
सध्या उकाडा मोठ्या प्रमाणात असल्याने अनेकजण दरवाजा उघडा ठेवून किंवा बाहेर झोपणे पसंद करत असल्याने आता काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच आता नागरीकांनी केवळ पोलीसांच्या मदतीच्या भरवश्यावर न बसता स्वत: सतर्क होवून गावागावात युवकांनी गस्ती पथकं तयार करून स्वत:चे रक्षण स्वत: च करण्याची गरज असल्याचे दिसत आहे. याच दरम्यान तो गुलाबी रंगाचा शर्ट घातलेला तो चोरटा काहींनी येथून जवळच असलेल्या चारी क्र. 15च्या परीसरात त्याच रात्री बघीतल्याची चर्चा सुरू होती याचा अर्थ हे चोरटे ही पल्सर धारक होते असा अनेकांचा कयास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!