बदलापूर घटनेतील आरोपी विरुद्ध कडक कारवाई साठी प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस मा. सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांचे महिला समवेत निवेदन
टाकळीभान प्रतिनिधी — राजु काजी
बदलापूर येथील घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी असून या घटनेतील आरोपी विरुद्ध जलद गतीने न्यायालयीन निर्णय होऊन त्यांवर कडक कारवाई करावी या आशयाचे निवेदन प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस मा. सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी श्रीरामपूर महिला मंडळ यांच्या समवेत तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांना व विविध शासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की बदलापूर येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केलेल्या अमानुष अत्याचाराचा आम्ही सर्व महिला निषेध करत आहोत. माणुसकीलाच नव्हे तर भारतीय संस्कृतीला काळीमा फासणारी अत्यंत लाजिरवाणी व किळसवाणी अशी ही घटना आहे.
या घटनेच्या मुळाशी जाऊन तपास व्हायला हवा, यातील आरोपी विरुद्ध ‘पोक्सा’ कायद्यानुसार तसेच भारतीय दंड संहितेनुसार कडक कारवाई व्हावी व आरोपींना कडक शिक्षा व्हायला हवी. अशी प्रकरणी तातडीने निकाली काढण्यासाठी जलदगती न्यायालयाद्वारे चालविण्यात यावी. शासनाने त्यासाठी तज्ञ वकिलांची नेमणूक करून या बालिकेला न्याय मिळवून द्यावा.
असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी काही नियमावली देखील शासनाने करावी. शैक्षणिक संस्थांमध्ये स्वच्छतेचे काम कंत्राटी पद्धतीने देऊ नये. अशा ठिकाणी सर्वच पुरुष कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याऐवजी महिला कर्मचाऱ्यांचा देखील समावेश असावा. तसेच या घटनेची रीतसर चौकशी होऊन प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या आरोपींना कडक शासन झाले पाहिजे. अशा आरोपींना आमच्या सारख्या महिला मंडळाच्या स्वाधीन केल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांच्या गळ्यात चप्पल बुटांचा हार घालून त्याची गाढवावरून धिंड काढू, म्हणजे अशी कृती करणाऱ्यांना पायबंद बसेल.
सदर घटनेबद्दल आमच्या महिला भगिनींच्या तीव्र भावना असून आमच्या निवेदनाचा गंभीर्याने विचार करावा व अत्याचारीत बालीकेला न्याय मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक श्रीरामपूर यांना देण्यात आल्या आहेत. या निवेदनावर रुबीना पठाण (तालुका समन्वयक महिला काँग्रेस) शांताबाई जाधव खिर्डी, प्रमिला सुरडकर, माया सूर्यवंशी, चंद्रकला राशिनकर, रुकसाना बागवान, रजिया शहा, दिलेखा बागवान, रेखा साळवी ,वैशाली खंडीझोड, खुशबू पठाण, शकुंतला शेळके , सुनंदा दरंगे, अरुणा जोर्वेकर, मंगल उगले, आशा बाविस्कर, शालिनी विभुते, जोस्ना राऊत, देवकर ताई ,काळे ताई आदीसह महिला मंडळाच्या साह्या आहेत.